Commerce

वाणिज्य शाखेमधील करिअरच्या विविध संधी
डॉ. सुषमा भोसले
Monday, June 16, 2014 AT 06:07 PM (IST)
आपल्या समाजामध्ये विविध व्यवसायांशी निगडित "प्रतिष्ठे'च्या कल्पना जोडल्या गेल्यामुळे व दुर्दैवाने आपली वृत्ती ठराविक अभ्यासक्रमांविषयी श्रेष्ठ-कनिष्ठ उतरंड मानण्याची असल्यामुळे ठराविक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी वाढती झुंबड दिसते. आज आपल्या अवतीभोवती पुष्कळ बदल होत आहेत. नवी-नवी क्षेत्रे खुली होत आहेत व प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी खूप वाव आहे. शालान्त परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरविषयी महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो. कला, वाणिज्य, शास्त्र शाखा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम यापैकी कोणताही एक पर्याय निवडण्याचे अवघड काम करायचे असते. 
करिअर करण्यासाठी "वाणिज्य' क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. वाणिज्य शाखेमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे इयत्ता 12 वी नंतर विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बी.कॉम. या पारंपरिक पदवीव्यतिरिक्त बी.बी.ए. (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन) व बी.सी.ए. (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) हे पदवी अभ्यासक्रम विविध महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक महाविद्यालयाची स्वतंत्र प्रवेश परीक्षा असते. एम.कॉम. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त एम.सी.एम. (मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट) व एम.सी.ए. (मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन) हे पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एम.सी.एम. हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे व एम.सी.ए. हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. यातून विविध व्यावसायिक व खासगी क्षेत्रात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत. 
बी.कॉम.नंतर संगणक क्षेत्रातील अद्ययावत विविध कोर्सेस केल्यास व्यवसाय व नोकरीच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. 
कॉम्प्युटरसंदर्भातील आर.डी.बी.एम.एस., ओरॅकल, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, वेबपेज डिझायनिंग इत्यादी कोर्सेसनंतर बॅंक अधिकारी, ज्युनिअर ऑडिटर, प्रकल्प सहायक, ऑफिस असिस्टंट यांसारख्या पदांवरील नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. ई-कॉमर्सच्या संदर्भातील विविध कोर्सेस केल्यास ऑडिटर, ई-कॉमर्स सहायक अधिकारी म्हणून नोकरी करता येऊ शकते. तसेच स्वतःचा फ्रॅंचाईजी व्यवसाय सुरू करता येईल. ऍप्टेक आणि आयबीएम यासारख्या संस्थांमधून या संदर्भात प्रशिक्षण घेता येईल. 
वाणिज्य शाखेमधील दोन महत्त्वाचे अभ्यासक्रम म्हणजे सी.एस. (कंपनी सेक्रेटरी) आणि सी.ए. (चार्टर्ड अकाउंटंट). सी.एस. हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी द इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडे रजिस्ट्रेशन करावे लागते. या अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी फाउंडेशन हा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. त्यानंतर एक वर्षाने इंटरमिजिएट परीक्षेला बसता येते. ही परीक्षा पास झाल्यानंतर अंतिम परीक्षा देता येते. या अभ्यासक्रमामध्ये दीड वर्ष प्रॅक्‍टिकल ट्रेनिंग अनिवार्य आहे. दर वर्षी जून व डिसेंबर या महिन्यांत परीक्षा घेतल्या जातात. या अभ्यासक्रमानंतर सेवा क्षेत्रात, विविध महामंडळे, सरकारी क्षेत्र, तसेच खासगी कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमानंतर स्वतःचा व्यवसायही करता येतो. सी.ए. अभ्यासक्रमाला पदवीचा अभ्यास करतानाच सुरवात करता येणे शक्‍य आहे. या अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी फाउंडेशन व PEI प्रोफेशनल एज्युकेशन कोर्स पूर्ण करावा लागतो. 
याव्यतिरिक्त I.C.W.A. आणि C.S.A. या अभ्यासक्रमांमध्येसुद्धा फाउंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर सहभागी होता येते. या अभ्यासक्रमांनंतर विविध बॅंका, कंपन्या, इन्शुरन्स, स्टॉक एक्‍स्चेंज इत्यादी ठिकाणी नोकरी, तसेच स्वतंत्र व्यवसाय करता येतो. 
वाणिज्य शाखेतील पदवीनंतर व्यवस्थापन क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे फायदेशीर ठरते. प्रामुख्याने वित्तीय व्यवस्थापनाचा अभ्यास वाणिज्य शाखेत पदवीनंतर अत्यंत उपयुक्त आहे. वित्तीय व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन (Working Capital Management), भांडवली खर्चाचे नियोजन व मूल्यमापन (Capital Expenditure Planning & Evaluation) इत्यादींचा समावेश होतो. वित्तीय व्यवस्थापन घेऊन एम.बी.ए. झाल्यानंतर औद्योगिक, सेवाक्षेत्र, तसेच बॅंका, सरकारी व निमसरकारी संस्था यामध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत, तसेच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग आहेच. 
वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षा (MPSC आणि UPSC), ग्राफिक डिझायनिक, पत्रकारिता, जनसंपर्क अधिकारी, ट्रॅव्हल आणि टुरिझम या क्षेत्रांमध्ये करिअर करता येणे शक्‍य आहे. 
वाणिज्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी आकडेमोडीची सवय, सराव, आवड, निश्‍चयी वृत्ती, चिकाटी व इंग्रजीचे ज्ञान आवश्‍यक आहे. साहजिकच वाणिज्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी विमा, शेअर मार्केट व म्युच्युअल फंडातील सेवासंधीसुद्धा उपलब्ध आहेत. Life Insurance व General Insurance कंपन्यांमध्ये नोकऱ्यांच्या विविध संधी उपलब्ध आहेत. या संदर्भातील अधिक माहिती www.irdaindia.org या साईटवर उपलब्ध आहे. शेअर मार्केटमध्ये काम करण्यासाठी SEBI (Security Exchange Board of India) र्त परीक्षा घेतल्या जातात. या संदर्भातील संपूर्ण माहितीसाठी www.sebi.gov.in ही वेबसाईट पाहणे उपयुक्त ठरेल. तसेच म्युच्युअल फंड विक्रीसाठी एजंट म्हणून काम करावयाचे असल्यास www.amfindia.com या वेबसाईटवर उपयुक्त माहिती आहे. 
वाणिज्य शाखेतील महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम खालील तक्‍त्यात दर्शविलेले आहेत. ते अभ्यासक्रम पूर्ण करण्यासंदर्भातील अर्हता व अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या उपलब्ध संधीही स्पष्ट केलेल्या आहेत. 

थोडक्‍यात काय तर वाणिज्य शाखेत करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाची कोणतीही शाखा "चांगली' किंवा "वाईट' नसते. मात्र आपली आवड, कुवत, बलस्थाने ओळखून योग्य प्रशिक्षणाच्या साह्याने कौशल्ये विकसित केली की करिअर यशस्वी ठरविणारे तुमच्यासारखे तुम्हीच! 
This website was created for free with Own-Free-Website.com. Would you also like to have your own website?
Sign up for free